बीड - कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक विभागातील अधिकारी, कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. पण, बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात आरोग्य विभागासारख्या अतीमहत्त्वाच्या विभागात रिक्त पदांमुळे मनुष्यबळाचा अभाव दिसून येत आहे. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची आठशेच्या आसपास तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल 70 पदे रिक्त आहेत. केवळ आरोग्य विभागात नव्हे तर महसूल विभागात देखील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.
एवढेच नाही तर एका तहसीलदाराकडे दोन-दोन तालुक्याचा पदभार आहे. याचाच परिणाम बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागासह इतर विभागात सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर झाला आहे. त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. आरोग्य विभागासह इतर बहुतांश विभागात प्रभारी अधिकाऱ्यांवरचं बीडचा कारभार हाकला जात आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यातील बंधपत्रित अस्थायी आदेश अनेक महिन्यांपासून दिलेले नाहीत, ते देऊन आम्हाला कोरोनाच्या या युद्धात सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी प्रियंका जगताप व शरद मोराळे यांच्यासह 53 बंधपत्रित परिचारिकांनी केली आहे.
कोरोनाशी लढायचे कसे?, बीड जिल्ह्यात आरोग्य विभागासह अनेक विभागातील पदे रिक्त सार्वजनिक आरोग्य खात्यातील लातूर विभागामधील बंधपत्रित अस्थायी आदेश अनेक महिन्यांपासून रखडलेले आहेत. एकीकडे आरोग्य विभागात परिचारिकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तर दुसरीकडे बंधपत्रित कर्मचारी परिचारिकांना पुर्ननियुक्ती दिल्या जात नाहीत. परिचारिका संवर्गातील हे बंद पत्रीत कर्मचारी या कोरोनाच्या युद्धात सहभागी व्हायला तयार आहेत. मात्र लातूर आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयाकडून नियुक्ती आदेश दिले जात नाहीत. या बिकट परिस्थितीत तरी सार्वजनिक आरोग्य विभागाने आम्हाला पुर्ननियुक्त्या देऊन कोरोनाच्या युद्धात सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील 53 पुर्ननियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या परिचारिका व ब्रदर यांनी केली आहे.
अशी आहे महत्वाच्या विभागांची स्थिती -कोरोनामुळे सध्या उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत महत्त्वाचा विभागात आरोग्य विभाग, महसूल विभाग, नगर विकास, ग्राम विकास यांचा समावेश आहे. आपत्तीच्या काळात लोकांना धान्य वाटप करणाऱ्या पुरवठा विभागातील, पुरवठा अधिकारी गवळी हे अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव हे सांभाळतात. गेवराई येथील तहसीलदार रजेवर आहेत. बीड तालुक्याची जबाबदारी शिरूर कासार येथील तहसीलदार यांच्याकडे आहे.
गेवराईचा पदभार माजलगाव तहसीलदारांकडे आहे. तर आष्टीचा पदभार तेथील नायब तहसीलदार यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपवण्यात आला आहे. याशिवाय धारूर नगरपालिका देखील प्रभारी मुख्याधिकारी यावर चालवली जाते. विभागातील रिक्त पदांमुळे बीड जिल्ह्यात प्रशासनातील कामे संथ गतीने होत आहेत. अशात, कोरोना महामारीचे संकट समोर आहे. या संकटात लढायचे कसे? असा सवाल दबक्या आवाजात अधिकारी, कर्मचारी विचारत आहेत.
हेही वाचा -सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; भाजप आमदारासह 22 जणांवर परळीत गुन्हा दाखल
हेही वाचा -गेवराई धान्य घोटाळ्याची पाळेमुळे वरिष्ठांपर्यंत, फिर्याद देणारा तहसीलदारच निघाला आरोपी