बीड -जिल्ह्यातील गेवराई येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया केली जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. 12 ते 15 हजार रुग्णांची तपासणी केलेले हेच शिबीर 31 मार्चपर्यंत चालणार असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाचशे शस्त्रक्रिया मोफत करण्याचे उद्दिष्ट आहे.
गेवराई येथील राष्ट्रवादी शिवजयंती उत्सव समिती यांच्या विशेष पुढाकारातून व बीड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीर गेवराई येथे सुरू आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी तसेच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून योग्य औषधोपचार देऊन शस्त्रक्रिया केल्या आहेत. या महाआरोग्य शिबिरात दोनशेहून अधिक वेगवेगळ्या आजारासंबंधीच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. या शिबिरात डोळ्यांची शस्त्रक्रिया, गर्भ पिशवी शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन तसेच इतर लहान आजारासाठी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.