महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर खात्यातील राजकरण रोखण्याचे आव्हान - harsh poddar

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूर येथून हर्ष पोद्दार यांची जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. मालेगाव सारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवणारे अधिकारी म्हणून हर्ष पोद्दार यांची सबंध महाराष्ट्राला ओळख आहे.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

By

Published : Jul 20, 2019, 10:21 AM IST

Updated : Jul 20, 2019, 11:33 AM IST

बीड- 'सोशल पोलिसिंग' मध्ये पटाईत असलेले पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शनिवारी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. येणाऱ्या काळात त्यांच्या समोर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणासह २०१९ च्या विधानसभा निवडणुका तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, गुंडागर्दी इत्यादी प्रकारचे गुन्हे रोखणे याचे आव्हान असणार आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूर येथून हर्ष पोद्दार यांची बीड पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली. मालेगाव सारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवणारे अधिकारी म्हणून हर्ष पोद्दार यांची सबंध महाराष्ट्राला ओळख आहे. याशिवाय दहशतवाद रोखण्यासाठी केवळ बळाचा वापर न करता सोशल पोलिसींगचा फंडा वापरून तरुणांना बरोबर घेऊन काम करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी जवळपास ४५ हजार तरुणांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन केले आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांमधील राजकारण अनेक वेळा चव्हाट्यावर आले आहे. एखाद्या विभागाकडे घटनेचा तपास असेल, तर त्या तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रकारही पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणामुळे घडलेला आहेत. त्यामुळे नवे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना या सगळ्या टीम बरोबर काम करण्याचे आवाहन आहे.

याशिवाय जिल्हा पोलिसांवर काही दिवसांपूर्वीच वाळू वाहतूकदारांनी हफ्ते घेत असल्याचा ठपका ठेवला आहे. याप्रकरणी वाळू माफियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पोलिसांद्वारे हफ्ते वसूली होत असल्याचा खुलासा केला होता. मात्र, आता पोलिसांवर लागलेल्या हफ्ता वसूलीचे कलंक, तसेच बीड पोलिसांची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी पोद्दार यांच्यावर असणार आहे.

त्याचबरोबर विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या आहेत. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात शांततेत निवडणुका पार पाडण्याचीही मोठी कसोटी पोद्दार यांच्यासमोर असेल. यावेळी मालेगाव सारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी कामाचा अनुभव असल्यामुळे जिल्ह्याला त्यांच्या अनुभवाचा सकारात्मक फायदा होऊ शकतो.

Last Updated : Jul 20, 2019, 11:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details