बीड- मार्च, एप्रिल हे दोन महिने कुटुंबापासून दूर राहून राजस्थानच्या कोटा येथे काढले. खिशात पैसे असतानाही काही विकत घेऊन खाता येईना. जेव्हा मेसवरून डब्बा येईल तेव्हाच जेवण मिळायचे. गावाकडून आई-वडिलांचा फोन यायचा. यावेळी मला कुटुंबापासून दूर असल्याची जाणीव व्हायची. खरंतर या दोन महिन्यात जे मी शिकलो, ते आयुष्यभर शिकलो नसतो, अशी प्रतिक्रिया देत कोटा येथून परतलेल्या त्या ५५ मुलांमधील अभिषेक राम वनवे या विद्यार्थ्याने 'त्या' दोन महिन्यातील आपली आपबिती 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितली.
अभिषेक म्हणाला, माझी नुकतीच बारावी झालेली. बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नाही. केवळ कॉलेज आणि अभ्यास एवढेच काय ते माझे विश्व. बारावीनंतर अभियांत्रिकी शिक्षणाच्या पूर्वी जेईईसाठी राजस्थानमधील कोटा येथे मी मार्चमध्ये प्रवेश घेतला आणि कोट्याला पोहोचलो. तिथे पोहोचल्याच्या ८ दिवसानंतर सबंध देशावरच कोरोनाचे संकट कोसळले आणि सुरू झाला आमचा संघर्षमय प्रवास. कोटा येथे गेल्यानंतर तिथल्या वातावरणाशी व्यवस्थित जुळले देखील नव्हतो तोच सबंध देशावर कोरोणाचे संकट ओढावले आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. सगळे कोचिंग क्लासेस बंद झाले. कोटामधील विद्यार्थ्यांची किलबिल व रस्त्यावरील गर्दी झपाट्याने ओसरली. सगळे रस्ते निर्मनुष्य झाले. माझ्याबरोबर इतर राज्यांमधील म्हणजेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तसेच गुजरातचे काही मुलेही होते. त्यांच्या सरकारने त्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था तात्काळ केली. मात्र, आम्ही महाराष्ट्रातील २४ जण कोट्यामध्ये दोन महिने अडकून पडलो.