महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुख्यात गुंड गुज्जर खानच्या आवळल्या मुसक्या; दरोडा प्रतिबंधक विभागाची कारवाई - gujjar khan

संपुर्ण प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांची कामगिरी महत्वाची असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना प्रत्येक पथकाने, स्थानिक गुन्हा शाखेने  मदत केली असल्याचे, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

कुख्यात गुंड गुज्जर खानच्या आवळल्या मुसक्या

By

Published : Oct 9, 2019, 6:57 PM IST

बीड- येथे पंधरा दिवसांपूर्वी शिक्षक सय्यद साजिद यांचा खून झाला होता. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गुजरखान फरार होता. अखेर दरोडा प्रतिबंधक पथकाने चार राज्यात सापळा रचून गुज्जर खानच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

कुख्यात गुंड गुज्जर खानच्या आवळल्या मुसक्या

हेही वाचा-जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?

शिक्षकाच्या हत्या प्रकरणासह गुज्जर पोलिसांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात देखील पोलीस त्याचा शोध घेत होते. गुज्जर खानवर तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तब्बल ४ दिवसांच्या अथक पाठलाग आणि ४ हजार किलोमीटरच्या प्रवासानंतर दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव आणि त्यांच्या पथकाने गुज्जरच्या अटकेची कारवाई केली. बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा-पुण्यात राज ठाकरेंच्या सभेआधी पावसाची बॅटींग.. मैदान चिखलमय

बीड येथील शिक्षक सय्यद साजेद यांची १९ सप्टेंबरला बीड शहरात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. कुख्यात गुंड गुज्जर खानने आपल्या सहकाऱ्यांसह ही हत्या केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही गुज्जर खानने बीड शहराच्या बालपिर परिसरात एका व्यापाऱ्याला खंडणी मागून त्याचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. हत्येच्या घटनेनंतर या खंडणी प्रकरणात देखील मोक्का लावण्याचा निर्णय बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला होता. मात्र, १९ सप्टेंबरपासून गुज्जर फरार होता. स्वतः पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे हे परिस्थीतीची माहिती घेत होते. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक हे सारेच गुज्जर आणि त्याच्या साथिदारांच्या मागावर होते. अखेर दरोडा प्रतिबंधक पथकाने तब्बल चार राज्यात त्याचा पाठलाग केला. देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेल्या गुज्जरला अखेर बीडलाच यावे लागले. आणि दरोडा प्रतिबंधक पथकाला त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. गुज्जरकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गुज्जर आणि त्याचे सहकारी हे खुंखार गुंड असून बालेपीर परिसरात त्यांची दहशत आहे.

चार राज्यात फिरुन पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होता गुज्जर-
बीडमध्ये हत्या केल्यानंतर हे प्रकरण गंभीर वळण घेईल, असे गुज्जरला वाटले नव्हते. मात्र, या हत्येनंतर बीड शहरात मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. गुज्जरवरील गुन्ह्याची माहिती घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोक्का लावण्याचा निर्णय घेतला. तसेच कुठल्याही परिस्थितीत गुज्जर हवाच अशी भूमिका घेतली. त्यामुळे गुज्जरला आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेल्याची खात्री झाली. तो सुरवातीला परळीला गेला. त्यांच्यासाठी बीडमधून वसिम नामक व्यक्तीने पैसे जमा केले. गुज्जरने नेकनूरमधून गाडी उपलब्ध करुन परळी गाठली. मांडवा येथून एक सिमकार्ड खरेदी केले. त्यानंतर तो लातूरला गेला. तेथून तो रेल्वेने हैदराबाला गेला. हैदराबादमध्ये पोलीस आपल्या मागावर असल्याची भनक त्याला लागली. मात्र, तोपर्यंत दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, संदीप सावळे आणि टीम तिथे पोहचली होती. एका घरात त्याचा भाच्चा नासेर लपल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी त्या घराला घेरले. नासेरने तेथून पळ काढला असता गजानन जाधव यांनी त्याला सिने स्टाईल पाठलाग करुन पकडले, मात्र, दुसऱ्या घरातून गुज्जर पसार झाला. हैदराबादमधून गुज्जर थेट दिल्ली आणि अजमेरला गेला. तेथून तो माऊंट अबु आणि कच्छला गेला. तेथून त्याचा पाकिस्तानात जाण्याचा विचार होता. मात्र, त्याला 'लिंक' मिळाली नाही. त्यामुळे तो म्हैसाना येथे आला, तेथून भांडू येथे त्याने काही सेकंदासाठी सिमकार्ड मोबाईलमध्ये टाकले, आणि दरोडा प्रतिबंधक पथकाला त्याची भनक लागली. तेथून तो थेट पुण्यात आला. पुण्याच्या विमाननगर भागात तो वास्तव्याला होता. मात्र, पोलीस मागावर असल्याने तो बीडला आला. मागावरच असलेई पथकाने अखेर त्याला तेथे गाठले त्याच्या मुसक्या बांधल्या.

अधिकाऱ्यांचा अभिमान-
या संपुर्ण प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांची कामगिरी महत्वाची असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना प्रत्येक पथकाने, स्थानिक गुन्हा शाखेने मदत केली असल्याचे, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details