महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारीत तंत्राचे धडे, पोकरा प्रकल्पांतर्गत 'बीबीएफ' पद्धतीचे मार्गदर्शन

उगवणक्षमता कमी होण्यास बियाण्यांचा दर्जा तर कारणीभूत असतोच, शिवाय चुकीचे पेरणी तंत्र, अनियमित पर्जन्य हे घटकही मारक ठरतात. यामुळे यंदाच्या हंगामात ‘शुद्ध बीजारोपण’ करण्यासोबत ‘तंत्रशुद्ध पेरणी’ करण्यासाठी कृषी विभागाने रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पेरणी तंत्रज्ञान जनजागृतीची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारीत तंत्राचे धडे
ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारीत तंत्राचे धडे

By

Published : Jun 11, 2021, 1:20 PM IST

केज (बीड)उगवणक्षमता कमी होण्यास बियाण्यांचा दर्जा तर कारणीभूत असतोच, शिवाय चुकीचे पेरणी तंत्र, अनियमित पर्जन्य हे घटकही मारक ठरतात. यामुळे यंदाच्या हंगामात ‘शुद्ध बीजारोपण’ करण्यासोबत ‘तंत्रशुद्ध पेरणी’ करण्यासाठी कृषी विभागाने रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पेरणी तंत्रज्ञान जनजागृतीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पेरणी योग्य होण्यासाठी गावपातळीवर ट्रॅक्टर चालक, मालक, शेतकरी यांना सुधारित पेरणी तंत्र अवगत करून देणे आवश्यक असते. यासाठी बीड कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

बीड कृषी विभागाने मंगळवारी आयोजित केलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंबा सरी पेरणी तंत्रज्ञान अवलंबण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्र डीघोळ अंबाचे कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी बीबीएफ टोकन यंत्राची ओळख व उपयोगीता तपशील, पिकांच्या दोन ओळींतील अंतरानुसार टोकन यंत्राच्या भागाची योग्य जुळवणी या तांत्रिक बाबींची माहिती दिली. प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी प्रगतिशील शेतकरी श्रीकांत काकडे यांच्यासोबत संवाद साधत बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यास एकरी आठ किलो बियाण्याची व खताची बचत होऊन खर्चातही बचत होते. मूलस्थळी जलसंधारण होत असल्याने कमी पाऊस झाल्यास सरीमुळे जास्त काळ ओलावा टिकून राहतो, तसेच जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर निघून जाते. सरीमुळे हवा खेळती राहते व पिकास भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे शेंगा चांगल्या भरतात परिणामी पीक उत्पादन वाढीस मदत होते. शिवाय सरीमुळे फवारणीची कामे सुलभतेने करता येतात, व सरीमध्ये तुषारचे पाईप टाकून पाणी देणे सोईचे होते. सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ हेत असल्याची माहिती दिली. प्रगतिशील शेतकरी दिलीप फुके यांनी बीबीएफ पेरणी करताना ट्रॅक्टर चालकांच्या होणाऱ्या चुका व शेतकऱ्यांमध्ये पसरलेले गैरसमज यासंदर्भात माहिती देऊन या समस्या सोडवण्यासंदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

पेरणीसाठी बीबीएफ यंत्र उपलब्ध न झाल्यास काय करावे?

पेरणीकरिता बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक पेरणी यंत्राचा तिफणीचा एक नळ बंद ठेवून पेरणी करावी व पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांत रिजर किंवा बळीराम नांगराच्या साहाय्याने प्रत्येक तीन ते चार ओळीनंतर सरी काढाव्यात, तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत बीबीएफ पध्दतीने पेरणी केल्यास, प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी १००० रुपये अनुदान देण्यात येईल त्यासाठी डीबीटी पोकरा वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन शिवप्रसाद येळकर यांनी केले.

हेही वाचा -मालाड इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू; दूध आणायला गेलेले रफी बचावले

ABOUT THE AUTHOR

...view details