बीड - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथील पोलीस मुख्यालय येथील मुख्य शासकीय ध्वजारोहन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. समाजातील वंचित, उपेक्षित व शेतकरी बांधवांसाठी हे सरकार व प्रशासन तत्परतेने काम करेल, असा विश्वास देत पालकमंत्री मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथील ५ अंध असलेल्या व्यक्तींना प्रत्येकी १ लक्ष रुपयाची मदत दिली. तसेच, राज्य शासनाने घोषित केलेल्या महत्त्वाकांक्षी 'शिवभोजन योजनें'तर्गत हॉटेल समाधान येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर बोलताना पालकमंत्री मुंडे म्हणाले की, समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न प्रशासन करेल, अशी मला अपेक्षा आहे. याप्रसंगी पालकमंत्री मुंडेंनी बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील यादव निवृत्ती क्षीरसागर, विठ्ठलबाई यादव क्षीरसागर व त्यांचा मुलगा सम्राट यादव क्षीरसागर तर दुसऱ्या कुटुंबातील राजाबाई साठे, मुरलीधर साठे, छबुबाई साठे या अंध व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर राज्यभरात शिवभोजन योजना सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ५० पेक्षा अधिक ठिकाणी शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना पदार्थाची गुणवत्ता राखून केवळ १० रुपयात ताजे भोजन दिले जाणार आहे.