बीड -जिल्ह्यातील कोविड लसीकरण सरावफेरीला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी उपजिल्हा रुग्णालयात आरंभ करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समजून घेत लसीकरणाचे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ना. मुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लसीकरण कक्षाची फीत कापून पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना सराव फेरी दरम्यान लस देण्यास आरंभ करण्यात आला. राज्यात आज ३० जिल्हे आणि २५ महानगपालिकांमध्ये लसीकरणाची सरावफेरी राबविण्यात येत आहे. लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामुग्री इत्यादी सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली असून, याची प्रत्यक्ष पाहणी आज मुंडे यांनी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. राधाकीसन पवार, डॉ. दिनेश कुरमे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. संजय कदम, डॉ. अर्षद आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.