बीड - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो मजूर मुंबई- पुण्यातून आपापल्या गावी रवाना झाले. काहींनी सायकलवर तर काहींनी चालत प्रवास करून गाव गाठले. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच गावाकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा शहराचा रस्ता धरलाय. नोकरी गमावण्याची भीती त्यांच्या मनात घर करत आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने कामगारांनी पुन्हा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जागर प्रतिष्ठानच्या सर्वेक्षणात संबंधित माहिती समोर आल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
बीड हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. साडेसात ते आठ लाखांहून अधिक मजूर दरवर्षी ऊसतोडणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत जातात. यात ऊसतोड कामगारांव्यतिरिक्त इतर मजूर देखील पुणे-मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजंदारीवर काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच लाखांहून अधिक मजूर गावी परतले होते. या काळात दोन-अडीच महिने गावात थांबल्यानंतर पुन्हा मजूरांवर उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे त्यांची शहरात जाण्यासाठी धडपड सुरू झाली. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच अनलॉक-१.० मध्ये सरकारने नियमांमधील शिथिलता वाढवली. महानगरांतील छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू झाल्या. मात्र मुंबई-पुण्यात राबणारे मजूर गावाकडे परतल्याने या ठिकाणी मजुरांची कमी भासू लागली. यानंतर कंत्राटदार मजुरांना जमेल त्या मार्गाने परत आणण्याची सोय करत आहेत.
पूर्वीची हात नोकरी जाऊ नये, म्हणून जीवाची परवा न करता गावागावातील मजूर पुन्हा मुंबई-पुण्याकडे स्थलांतरीत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी सांगितले.
सव्वा लाखाहून अधिक मजूर परतले होते बीडमध्ये
संचारबंदी सुरू झाल्यानंतर ऊसतोड मजूर वगळता, महानगरांमध्ये छोटी-मोठी कामे करणारे सुमारे सव्वा लाखाहून अधिक मजूर बीड जिल्ह्यात परतले होते. यापैकी 40 टक्क्यांहून अधिक कामगार नोकरी जाण्याच्या भीतीने पुन्हा स्थलांतरीत होत आहेत. याबाबत अधिक माहिती जागर प्रतिष्ठानने दिली आहे.