महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बीड, शिरूरमध्येही उभारणार कोविड केअर सेंटर - पंकजा मुंडे - बीड कोरोना बातमी

कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता परळी प्रमाणेच बीड, शिरूर येथेही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

By

Published : Apr 29, 2021, 2:22 PM IST

बीड - जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता परळी प्रमाणेच बीड, शिरूर येथेही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी आज सांगितले. कोरोनाचा लढा सर्वांनी मिळून लढायचा आहे, रूग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी भरीव योगदान द्यावे असं आवाहनही त्यांनी केले.

आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार भीमसेन धोंडे आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व्हर्चुअल बैठक पंकजा मुंडे यांनी आज दुपारी घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी दौरा निश्चित केला होता. खासदार डॉ.प्रितम मुंडे या नुकत्याच कोविड सेंटरमध्ये जाऊन रूग्णांना भेटल्या, त्या क्वारंटाईन आहेत. कोरोनामुळे दौरा आणि गर्दीत कार्यकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी आज ऑनलाईन बैठक घेतली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान परळीत आयसोलेशन सेंटर व रूग्णांना घरपोच जेवणाचा डब्बा पोहोचविणार आहे, याच धर्तीवर बीड व शिरूर मध्येही कोविड केअर सेंटर सुरू करू, त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास रूग्णांचा औषधोपचार व जेवणाची जबाबदारी प्रतिष्ठान घेईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. इतर ठिकाणी आमदार महोदयांनी सेवा सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

तालुका स्तरावर टास्क फोर्स तयार करून रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे, रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखणे, जिल्ह्यात शासन व प्रशासनाचा निष्काळजीपणावर आवाज उठवणे आदींबरोबरच आगामी लसीकरण मोहीम प्रत्येक बुथवर प्रभावीपणे राबविण्यासाठी पंकजा मुंडे यांनी बैठकीत सूचना केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details