बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रेम प्रकरणातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत पोलीस कर्मचाऱ्याची प्रेयसी पूजा पाटील (रा. जळगाव) हिला शिवाजीनगर पोलिसांनी गुरूवारी बीड न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी न्यायालयाने पूजाला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आत्महत्या केलेले पोलीस कर्मचारी दिलिप केंद्रे यांची मागील काही महिन्यांपूर्वीच बीडला बदली झाली होती. ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. जळगाव येथे असताना त्यांचे पूजा गुलाब पाटील या युवतीशी प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, बीडला बदली झाल्यानंतर पूजा पाटील ही दिलीप यांना ब्लॅकमेल करून सतत पैशाची मागणी करीत होती. याला कंटाळून मंगळवारी दिलीप केंद्रे यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. मंगळवारी रात्रीच दिलीप यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पूजा गुलाब पाटीलच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.