बीड- जिल्हा रुग्णालयात एका सलाईनच्या बाटलीमध्ये शेवाळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याने या सलाईन पुरवठादारावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिले आहेत. या प्रकारामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! बीड जिल्हा रुग्णालयात सलाईनमध्ये आढळले 'शेवाळ'
बीड जिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीमध्ये शेवाळ आढळून आले आहे. त्यामुळे याठिकाणी रुग्णांच्या जीवाशी कोणी खेळ तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात ही सलाईन आढळून आली. तेथील परिचारीकांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांना उपचारादरम्यान लावण्यात येणाऱ्या सलाईनमधील घटक रक्तवाहिन्यांमार्फत शरीरात मिसळले जातात. त्यामुळे ही सलाईन रुग्णासाठी वापरली असती, तर एखाद्या रुग्णाला संसर्ग होण्याचा धोका होता. त्यामुळे आता सलाईनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होणार? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
घडलेल्या प्रकरानंतर जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, रुग्णांच्या जीवाशी कोणी खेळ तर करत नाही ना? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. यावर मात्र जिल्हा शल्य चिकित्सक थोरात यांनी बोलण्यास नकार दिला.