परळी वैजनाथ - राज्यासह जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना पाठोपाठ हे नवीन आव्हान समोर आले आहे. दरम्यान हा आजार अंगावर न काढता वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो. म्युकरमायकोसिस आजारांचे लक्षण असलेल्या रुग्णांनी श्री नाथ हॉस्पिटल येथे मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) रुपाने नवीन संकट देशासमोर उभे राहिले आहे. कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसच्या रुग्णात झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्युकरमायकोसिस आजाराचा परिणाम हा चेहरा, नाक, डोळे आणि मेंदूवर होऊ शकतो, या आजारामध्ये रुग्णांची दृष्टी जाण्याची देखील भीत असते. डायबिटिस, कोरोना पॉझिटिव्ह आणि स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये या बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक असते.
'म्युकरमायकोसिस'ची लक्षणे असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी कोणाला होऊ शकतो म्युकरमायकोसिस?
ज्यांचा डायबेटिस हा प्रमाणाच्या बाहेर आहे. सतत औषधांच्या सेवनामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. दीर्घकाळ आयसीयूमध्ये उपचार घेत असणारे रुग्ण. कॅन्सरसारख्या सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता असते.
काय काळजी घ्याल ?
धुळीच्या ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावा. बागकाम करताना पायात बूट, लाँग पँट, हातात ग्वोव्हज् घाला. त्वचेची ऍलर्जी होऊ नये म्हणून साबण लावून स्वच्छ हात-पाय धूत रहा.
कसा ओळखाल आजार?
सतत नाक गळणे, गालाचे हाड दुखणे, चेह-याच्या एका बाजूला तीव्र वेदना होणे किंवा सूज येणे, नाकाजवळील भाग किंवा टाळूवर काळसर डाग पडणे, दात दुखणे, दात पडणे, जबडा दुखणे, अंधुक दिसणे, डोळे दुखणे, ताप येणे त्वचेच्या विकृती होणे, छातीत दुखणे, त्वचेतून रक्तस्त्राव होणे, श्वसन क्रिया बिघडणे यातील लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करून घ्यावी.
आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
हायपरग्लायसेमिया नियंत्रित ठेवणे. कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे. डायबेटिस असणा-या व्यक्तींनी शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे योग्य डोस योग्यवेळी घेणे. अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल औषधांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करणे. दरम्यान रुग्णांना जर म्युकरमायकोसीसचे लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी श्रीनाथ हॉस्पिटल येथे 10 ते 1 वाजेपर्यंत संपर्क करावा, आणि म्युकरमायकोसिसची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
हेही वाचा -'फडणवीसांनी सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबाबत खोटी माहिती पसरवली'