आष्टी (बिड)लग्नाचे वय होऊन चाललेल्या तरुणांना जाळ्यात ओढून, त्यांच्याशी विवाह करणाऱ्या आणि नंतर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, पैसे उकळणाऱ्या टोळीच्या मुसक्या आष्टी पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी बनावट लग्न करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारास पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका तरुणाचा विवाह लातूर येथील एका महिलेसोबत गुरुवारी झाला होता. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी या महिलेने तरुणाकडे दोन लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देखील या महिलेने तरुणाला दिली. दरम्यान या प्रकरणी संबंधित तरुणाने आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फोनवरील संभाषणावरून तक्रारीची सत्यता तपासली. यात तडजोडीअंती या तरुणाने 80 हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिराळ रस्त्यावरील चौकात या महिलेसह एका पुरुषाला पैसे घेताना रंगेहात पकडले.