बीड -माजलगाव नगरपालिकेत 1 कोटी 61 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शनिवारी दुपारी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी बी. सी. गावित, लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर,अभियंता महेश कुलकर्णी अशी आरोपींची नावे आहेत. माजलगाव नगरपरिषदेत २२ रस्त्यांची व नाल्यांची कामे न करता अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
माजलगाव नगरपालिकेला ११ जानेवारी २०१७ विशेष रस्ता अनुदानाअंतर्गत १ कोटी ६१ लाख १ हजार १३० रुपयांच्या २२ कामांना मान्यता देण्यात आली होती. प्रशासनाने विविध योजनांअंतर्गत झालेल्या अपहारासंदर्भात ३ मे २०१९ला गठीत केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार या कामांची तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेमध्ये तसेच मोजमापांमध्ये तफावत आढळून आली आहे.