बीड -तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या मालेगावातील भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन त्यामध्ये 4 तरुणांचा मृत्यू झाला तर तीन जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. बीड-उस्मानाबाद महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अपघातात चौघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी
तिरुपती देवदर्शनासाठी निघालेल्या तरूणांचा टेम्पो ट्रॅव्हलर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावानजीक आल्यानंतर चाक फुटले. ते बदलण्यासाठी चालकाने वाहन बाजूला घेतले होते. चाक बदलत असतानाच बीडकडून उस्मानाबादच्या दिशेने भरधाव आलेल्या (एमएच २० इजी १५१७) क्रमांकाच्या टेम्पोने पाठीमागून भाविकांच्या वाहनास जोराची धडक दिली. दरम्यान, या अपघातात वाहनातील भाविक शरद विठ्ठलराव देवरे (४४, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (४६, रा. सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (४५, रा.दरेगाव, ता. मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (५०, रा. दरेगाव, ता. मालेगाव) हे चौघे जागीच ठार झाले. तर संजय बाजीराव सावंत (३८), भरत ग्यानदेव पगार (४७, दोघेही रा. सायने बु.) व गोकुळ हिरामण शेवाळे (३८, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ सोलापूरला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. चालकाविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-राज्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, दुर्घनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर