आष्टी(बीड) -पावसाळ्यात निरा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणणारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्याठी संजीवनी देणारी निरा-भीमा नदी प्रकल्प योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने 15 वर्षांपूर्वी घेतला होता. पण, राजकारणापायी व राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला होता. गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू असून, डिसेंबर 2022 पर्यंत योजना पूर्ण होणार आहे. त्यानंतर आष्टीकरांना हे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील 27 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असल्याची माहिती माजी आमदार भिमराव धोंडे यांनी दिली.
माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केली पाहणी हा प्रकल्प आष्टीतील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावात पश्चिम महाराष्ट्रातून एक टीएमसी पाणी येणार असून, या योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. बारामती तालुक्यातील निरा नदीवरील उद्धट बॅरेट या ठिकाणी माजी आमदार भिमराव धोंडे यांनी पाहणी केली. यावेळी माजी आमदार भिमराव धोंडे बोलत होते. पुढे बोलतांना धोंडे म्हणाले, निरा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यावर ओढवलेले महासंकट संपूर्ण देशाने पाहिले आहे. या महापुरामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. तर शेकडो टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाची निरा-भीमा नदी जोड योजनेतून एक टीएमसी पाणी आष्टी तालुक्याला मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त आष्टी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेतील कायदेशीर अडथळे आता दुर झाले असल्याने या योजनेचे काम सुरू असून 24 कि.मी चा असलेल्या बोगद्याचे काम 14.50 किमी झाले असून, जवळपास 65% काम पुर्ण झाले आहे. डिसेंबर 2022 पर्यंत ही योजना पुर्ण होणार असल्याची माहिती गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ श्रेणी-1 अधिकारी राहूल घनवट यांनी दिली. तसेच या योजनेचे काम पुर्ण क्षमतेने 24 तास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर -
दर वर्षी पावसाळ्यात निरेतील अतिरिक्त पाणी 115 टीएमसी कर्नाटकात वाहून जाते. हे पाणी अडवून भीमा खोऱ्यात वळविल्यास दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. 2004 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत सुमारे पाच हजार कोटींची होती. सन 2004 लाच आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्याला 1 टीएममसी पाणी मिळावे म्हणून राज्य मंञीमंडळात मागणी करत चारशे कोटी रुपायांचा खुंटेफळ साठवण तलाव मंजूर करून घेतला. सुरूवातीला या कामांचा विरोध झाला. पण, जसजसे या योजनेचे महत्व कळाले तसे या योजनेचे कामही प्रगतीपथावर सुरू झाले.