बीड - पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळलेल्या मृत वनरक्षक असलेल्या पतीने दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल आबासाहेब जगताप (रा. टाकळसींग, ता. आष्टी) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब मागणे, आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे केलेली मारहाण आणि शेती नावावर करण्यावरून पत्नी सतत त्रास देत असल्यामुळे अनिल यांनी गळफास घेत आपली जीवन संपवले. या प्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जमीन नावावर करून देण्यासाठी पतीचा शारीरिक व मानसिक छळ
अनिल यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या माहितीनुसार, अनिलचा विवाह २०१४ साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नीत सातत्याने वाद होऊ लागले. लग्ना अगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोबही ती मागू लागली. तसेच आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही, असेही तिने बजावले. दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर अनिल यांनी आई-वडिलांना घरी फरशी लावण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यात तुंबा मारला होता. याबाबत अश्विनीच्या आई-वडिलांना कळवले होते. मात्र, त्यांनी मुलीचीच बाजू घेतली. तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले. त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करून देण्याचा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.