बीड - अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या माय-लेकींना शुक्रवारी बीड येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एस. शेख यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सुनिता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे (रा. सिरसदेवी ता. गेवराई) अशी शिक्षा झालेल्या मायलेकींची नावे आहेत. सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडली.
बीड शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत या दोघी तिला पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून सिरसदेवी येथे बसस्थानक परिसरातील स्वत:च्या घरी वेश्या व्यवसाय करवून घेत होत्या. पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या महिला फौजदार दिपाली गीते यांनी खोटा ग्राहक पाठवून या माहितीची खातरजमा केली होती. यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी गीते यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून सिरसदेवी येथे छापा टाकून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पीडित मुलीची सुटका करण्यात आली.
याप्रकरणी गीते यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात सुनिता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे या मायलेकींविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलामानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.