बीड - बीड शहरात हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या पुरातत्व कंकालेश्वर मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम व दर्शनासाठी भाविकांची रांग असते. शेकडो वर्षात पहिल्यांदाच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंकालेश्वर मंदिराचे द्वार बंद आहे. मंदिराच्या दोनशे फूट दूरवरूनच भाविकांना कंकालेश्वर महाराजांचे दर्शन घ्यावे लागत असल्याचे चित्र गुरुवारी पहायला मिळाले.
पायरीवर माथा टेकून घेतले दर्शन
बीड जिल्ह्यात दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. परंतु यंदा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याच्या सूचना मंदिर समितीना दिलेल्या आहेत. बीड जिल्ह्यात परळी येथे प्रभू वैद्यनाथाचे व बीड शहरात कंकालेश्वर मंदिर महत्त्वाचे आहे. हे दोन्ही मंदिर गुरुवारी बंद होते. भाविकांना गाभार्यात जाण्यापासून रोखण्यात आलेले आहे काही भाविकांनी कंकालेश्वर मंदिराच्या गाभार्यापासून 200 फूट दूरवरूनच पायरीवर माथा टेकून दर्शन घेतले.
'दर्शन झाले असते तर बरे झाले असते'
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्हा भक्तांना गाभाऱ्यात जाऊन कंकालेश्वर महाराजांचे दर्शन घेता आले असते तर बरे झाले असते, मात्र जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असल्याने जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करत दूरवरूनच कंकालेश्वर महाराजांचे दर्शन घेत असल्याचे बीड परिसरातील भाविकांनी सांगितले.
'याआधी कधीच मंदिर बंद राहिले नव्हते'
बीड शहरातील कंकालेश्वर मंदिराला दीड ते दोन हजार वर्षाची परंपरा आहे. हे मंदिर प्राचीन मंदिर असून आमच्या पाच पिढ्यांपासून येथील आम्ही पुजारी असल्याचे सांगत संजीव महाराज गुरव पुढे म्हणाले, की याआधी कधीच हे मंदिर महाशिवरात्रीला बंद राहिलेले नाही. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे दरवर्षी भरगच्च कार्यक्रम असतात. दिवसभर भजन संध्या चालते. मात्र आज भाविकांच्या शिवाय शिवरात्री होतेय, याची आम्हाला खंत वाटत आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. महाशिवरात्रीची पूजा केवळ आम्ही पुजाऱ्यांनी एकत्र येऊन भाविकांशिवाय केली, असे ते म्हणाले.