बीड - जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर जप्ती पारगाव शिवारात एका कापसाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये सुमारे 75 कोटी रुपयाच्या कापसाचे गट्टे जळून खाक झाले आहेत. अग्निशमन विभागाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत.
आगीचे कारण अस्पष्ट -
बीड तालुक्यातील जप्ती पारगाव शिवारात एका गोदामामध्ये कापसाच्या गटांनी ठेवण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळी अचानक या गोदामाला आग लागली. आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी एकूण नऊ बंब दाखल झाले होते. घटनास्थळावर अग्निशमन विभागाचे जवान येईपर्यंत संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या गोदामात ठेवलेल्या कापसाच्या गट्ट्यांची किंमत 75 कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ही आग कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गोदामातील कापसाच्या गट्ट्यांचे मालक कोण आहेत? हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, एकूण जळालेल्या कापसामध्ये काही कापूस शासनाने ठेवलेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.