बीड -नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी सोशल डिस्टन्सचा फज्ज उडवत गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांची गर्दी जमवली. यावरून कराड यांच्यासह एकूण 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भाजप महिला आघाडीच्या डॉ. शालिनी कराड यांचादेखील समावेश आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; भाजप आमदारासह 22 जणांवर परळीत गुन्हा दाखल - gopinath gad parli news
बीडमध्ये गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवनिर्वाचित भाजप आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लातूर येथील भाजप आमदार रमेश कराड यांनी आमदारकी मिळाल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथ गड येथे गुरुवारी हजेरी लावली. आमदार कराड हे गोपीनाथ गडावर आल्यानंतर तेथे भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. परिणामी, बीडच्या जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचे यावेळी उल्लंघन झाले. त्यामुळे, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक विष्णू सुबराव घुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आमदार कराड यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड, डॉ. बालासाहेब कराड, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, दिनकर मुंडे, (सर्व रा.परळी), विठ्ठल मुंडे (रा.लिंबोटा) यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सपोनि. शहाणे करत आहेत.