बीड FIR Against BJP MLA Wife : विधान परिषदेचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह आणखी दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरशे धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याकडून आदिवासी शेतकरी कुटुंबाला धमकावल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांना विचारलं असता, बदनामी करण्याच्या हेतूनं राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महिलेला कथितरित्या विवस्त्र केल्याचा आरोप :जमिनीच्या वादातून एक महिला पुरुषांच्या पाठीमागं विवस्त्र धावतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याप्रकरणी जी महिला विवस्त्र होऊन धावत आहे, त्या महिलेचं कुटुंब मागच्या काही दिवसांपासून शेतजमीन कसत आहे. मात्र इतर दोघांनीसुद्धा त्या जागेवर आपली मालकी असल्याचा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी याच वादातून या ठिकाणी भांडण झालं. याच भांडणानंतर ही महिला एका पुरुषाच्या मागं विवस्त्र होऊन धावताना पाहायला मिळत आहे.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा झाला दाखल :संबंधित जागेचा वाद सोडवण्यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्या होत्या. प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्यानंतरही तो वाद वाढत गेला. या पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा जणांच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.