महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदी असतानाही कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

कोरोनग्रस्त आढळलेला सांगवी पाटण परिसर जिल्हाधिकार्‍यांनी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. मात्र, त्या परिसरात सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी परवानगी न घेता प्रवेश केला. याप्रकरणी पोलीस जिल्हा प्रशासनाने धस यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश केला
कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश केला

By

Published : May 19, 2020, 4:50 PM IST

बीड - जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील सांगवी पाटण येथे दोन दिवसापूर्वी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे सांगवी परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला होता. त्या परिसरात सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली. या त्यांच्या भेटीनंतर पोलीस जिल्हा प्रशासनाने धस यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात शक्य ती खबरदारी घेतली जात आहे. यातच, कंटेनमेंट झोन असलेल्या परिसराला पूर्णत: बंद करण्यात येत असून त्या परिसरामध्ये बाहेर जाण्यास अथवा बाहेरुन आत येण्यास परवानगी नसते. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील कोरोनग्रस्त आढळलेला सांगवी पाटण हा परिसर जिल्हाधिकार्‍यांनी कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केला आहे. मात्र, त्या परिसरात सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी परवानगी न घेता प्रवेश केला.

याप्रकरणी आमदार धस यांच्याविरोधात बंदोबस्तावर असलेले पोलीस नाईक कळसाने यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन कलम 188,269,270,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 51-ब अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सलीम पठाण हे करीत आहेत. तर, यापूर्वी देखील ऊसतोड कामगारांना सोडवण्यासाठी जिल्हा बंदी डावलून गेल्याप्रकरणी आमदार धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details