बीड :गोपीनाथ मुंडे यांनी 1 नोव्हेंबर 1999 साली स्थापन केलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावामध्ये काट्याची लढत होणार असल्याचे पाहावयास मिळणार आहे.
कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर :भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या निवडणुकीनंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यापैकी ही महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत 21 संचालक पदासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
मुंडे बहीण भावात संघर्ष :मुंडे बहीण भावात संघर्ष पहावयास मिळणार आहे. वैद्यनाथ कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे देखील कारखाना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने दोघा बहीण भावात संघर्ष पाहायला मिळणार आहे.
कसा आहे निवडणूक कार्यक्रम :भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक 21 संचालक पदासाठी होणार आहे. बुधवार 10 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर 16 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 17 मे रोजी छानणी होईल. 18 मे ते 1 जूनपर्यंत अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. 2 जून रोजी चिन्ह वाटप होईल, तर 11 जून रोजी मतदान आणि 12 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे : या निवडणुकीमध्ये दोघे मुंडे बहीण -भाऊ वेगवेगळे पॅनल उभे करण्याची शक्यता असून यामुळे पुन्हा एकदा मुंडे बहीण भावाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता वैद्यनाथ कारखान्यावर नेमके कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.
ऊसतोड कामगाराच्या कसा केला कारखाना उभा :ऊसतोड कामगाराच्या एका मुलाने 1 नोव्हेंबर 1999 ला या सहकारी साखर कारखाची सुरूवात केली. साखर सम्राटांनाही शह देण्यासाठीचे हे पहिले पाऊल होते. स्व. गोपीनाथ मुंडे राजकारणात पवारांना नडले, शिवाय सहकार क्षेत्रातही ताकद निर्माण करण्यासाठी त्यांनी कारखान्यांचेही जाळे तयार केले. त्यापैकीच एक साखर कारखाना म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना होय. परळीतल्या या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने काही दिवसापूर्वी छापा टाकला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला हा कारखाना पुन्हा चर्चेत आला. एकट्या वैद्यनाथ कारखान्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांनाही टक्कर दिली होती. या कारखान्याचा मराठवाड्याला मोठा फायदा झाला.
1999 पहिला गाळप हंगाम : स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी साखर कारखान्यासाठी हालचाली सुरू केल्या. पण काँग्रेस सरकार काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारखाना उभारणीस परवानगी मिळालीच नाही, असे बोलले जाते होतं. पण केंद्रात अटल बिहारी वाजपेयी सरकार येताच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या कारखान्याचा मार्ग मोकळा झाला. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या कार्यकाळात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी कारखान्याला मंजुरी मिळवली. कारखाना परवान्यासाठी प्रमोद महाजनांनी दिल्लीत मोठी ताकद लावली. युती सरकारच्या माध्यमातून झोन बंदीचा निर्णय हटवत शेतकऱ्यांना कुठल्याही कारखान्यावर ऊस नेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. 1 नोव्हेंबर 1999 ला कारखान्याच्या पहिला गाळप हंगाम सुरू झाला.
साखर उत्पादन करण्याचाही विक्रम :ऊसतोड मजुरांचा मुलगा ते यशस्वी कारखानदार असा स्थित्यंतराचा टप्पा ओलांडण्याची संधी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना वैद्यनाथ कारखान्याने दिली. त्यातच कारखान्याची कामगिरी लक्षवेधी ठरल्याने यशस्वी कारखानदार म्हणून मुंडे नावारूपाला आले. 1999 ला वैद्यनाथ कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार टनांची असताना साडेतीन हजार टनाच्या गाळपाचा विक्रम केला. एकाच दिवशी साडे पाच हजार पोती साखर उत्पादन करण्याचाही विक्रम केला.
वैद्यनाथचा पहिला गाळप :पहिल्याच गाळपात ऊसाला 800 रुपये प्रति टन भाव देण्यात आला. गळीत हंगामात 11.81 टक्के ऊसाचं गाळप करून आशिया खंडातील विक्रमी गाळप केल्याची नोंद या कारखान्याने केली. बीड, लातूर, परभणी या 3 जिल्ह्यांतून आलेल्या लाखो टन ऊसाचे गाळप झाले. विक्रमी गाळपाने मराठवाड्यातल्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटला. 475 रुपयांत एका साखरेच्या पोत्याचं उत्पादन करून खर्चात बचत आणि शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळाला.
साखर कारखान्यावर काँग्रेसचे वर्चस्व :महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर 1999 पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेही कारखानदारीत उतरले. मुंडेंना सहकार क्षत्रात मजबूती दिली ती वैद्यनाथ कारखान्याच्या यशाने. वैद्यनाथ कारखाना नव्हता तेव्हा अंबाजोगाई, रेणापूर, अहमदपूर, केज, गंगाखेड, वडवणी या भागातील उस बांधावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर यायची. पण वैद्यनाथ कारखान्यामुळे अतिरिक्त उसावर कायमचा तोडगा निघाला. वैद्यनाथ कारखान्याची वाटचाल लक्षवेधी ठरल्याने सहकारात बोलबाला असलेल्या अनेक नेत्यांनी ‘मुंडे पॅटर्न’ची दखल घेतली. प्रचंड तोटा सहन करूनही पुढे पंकजा मुंडेंनी हा कारखाना चालवला. पण एकेकाळी गोपीनाथ मुंडेंची ताकद वाढवणारा हा कारखाना सध्या बंद पडला. याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र यामध्ये हा कारखाना कोणाचा ताब्यात जातो याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
- Nitish Kumar Mumbai Visit: नितीश कुमार उद्या मुंबईत घेणार उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळाचे वेधले लक्ष
- Neet Exam : धक्कादायक प्रकार; परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परिधान करायला लावले उलटे अंतर्वस्त्र
- Bus Accident In Gandhinagar : खासगी बसची एसटीला जोरदार धडक, बसची वाट पाहणाऱ्या 10 प्रवाशांवर काळाचा घाला.