बीड- गोरगरीब गरोदर मातांना प्रसूतीनंतर चांगला आहार घेता यावा, यासाठी केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून या महिलांना भत्ता देण्यात येतो. मात्र, अनेक गरोदर माता यांच्याकडून योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची ऐनवेळी जुळवाजुळव होत नाही. यामुळे 50 टक्के हून अधिक गरोदर मातांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव बीड जिल्हा रुग्णालयात समोर आले आहे.
शासनाकडून माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलेला चांगला आहार घेता यावा यासाठी शासन प्रति महा सहाशे रुपये भत्ता देते. मात्र, या योजनेचा लाक्ष घेताना प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गरोदर मातांचे सर्व कागदपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न होतात. परंतु अनेक वेळा गरोदर मातांच्या नातेवाईकांकडे जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची उपलब्धता नसते. शासनाची योजना असताना देखील अनेक गरोदर मातांना या योजनेचा लाभ मिळत नाही. बहुतांश गरोदर माता कागदपत्र जुळवाजुळवी करण्यासाठी लागणारा वेळ अधिक जातो म्हणून तो लाभ न घेताच प्रसुतीनंतर जिल्हा रुग्णालयातून सुट्टी घेतात, ही वस्तुस्थिती आहे.
- प्रसुतीनंतर सुट्टीचे कार्ड
- बीपीएल कार्ड
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- माता बाल संगोपन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र