बीड - कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचण्याची मोहीम चार दिवसांपूर्वी राज्यभरात सुरू झाली. यामध्ये बीड जिल्ह्यात 17 हजाराहून अधिक आरोग्य कर्मचारी आहेत. बीड जिल्ह्यात दिवसाला 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा, लस टोचून घेण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. याबाबत पुढे येऊन बोलण्यास आरोग्य कर्मचारी तयार नाहीत. मात्र खाजगीत बोलताना अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले की, काही राज्यांमध्ये अनुचित घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला लस टोचून घेण्यासाठी भीती वाटत आहे. असे कारण पुढे केले जात आहे.
कोरोनाची लस अगदी सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी यापूर्वी देखील सांगितलेले आहे. लस कुठलीही असो टोचल्यानंतर थोडासा त्रास होणारच त्यामुळे आरोग्य कर्मचारी असो की, सर्वसामान्य नागरिक यांनी घाबरून न जाता कोरोनाची लस टोचून घ्यावी, असे आवाहन तज्ञांनी केलेले आहे.