बीड - कोरोनामुळे सध्या सगळ्या देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत. परिणामी बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठे संकटात सापडले आहेत. कांदा उत्पादनासाठी झालेला खर्च देखील यावर्षी निघाला नसल्याचे सांगताना कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. व्यापारी भाव पाडून चार ते पाच रुपये किलोने कांदा मागत आहेत, तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा शेतातच पडून असल्याने मातीमोल भावात विकण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे शेतकरी कडाबाई हजारे यांनी सांगितले.
कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल.... हेही वाचा...कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार टनांपर्यंत वाढवा ! अजित पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
बीड जिल्ह्यातील चाकरवाडी शिवारात साडेचारशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. यावर्षी एकरी 18 ते 19 टन कांद्याचे उत्पादन झाले. एका एकरात लागवडीसाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च झाला होता. चांगला भाव मिळेल म्हणून आम्ही भरपूर खर्च केला. मात्र, अचानक कोरोनाच्या संकटामुळे बाजारपेठा बंद झाल्या. तसे आमचे स्वप्नही लॉकडाऊन झाले, असे कांदा उत्पादक महिला शेतकरी कडाबाई हजारे आणि नानासाहेब हजारे यांनी सांगितले.
बीड तालुक्यातील चाकरवाडी गावात यावर्षी कांद्याचे चांगले पीक झाले होते. पिक जोरात आले मात्र, बाजारपेठा खुल्या नसल्यामुळे कांद्याचे पिक अद्याप शेतातच पडून आहे. व्यापारी भाव पाडून कांदा मागत आहेत. मात्र, शेतात पडलेला कांदा विकावा तर परवडत नाही आणि नाही विकावा तर पावसाचे दिवस जवळ आले आहे. त्यामुळे सगळा कांदा नासून जाईल, अशा द्विधा मनस्थितीत सध्या बीड जिल्ह्यातील हे कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत. एवढा मोठा खर्च करून देखील आमच्या पदरात काहीच पडले नाही. असे सांगताना शासनाने कांदा उत्पादकांसाठी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.