बीड - जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. गावागावांमध्ये नागरिकांसाठी टँकरने देण्यात येणारे पिण्याचे पाणी पिण्यास योग्य नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच मजुरांना हाताला काम देखील नाही, हे सर्व देण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं साहेब? अशी कैफीयत राजुरी येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजुरी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला असता, शेतकरी म्हणाले, साहेब या सरकारला पिण्यासाठी स्वच्छ पाणी, हाताला काम अन जनावरांना चारा द्यायला सांगा. छावणीवर येणारा चारा केवळ १५ किलो आहे. हा चारा गावरान जनावरांना पुरू शकतो. मात्र, जर्सी जनावरांना हा चारा पुरत नाही. आम्हाला टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, ते पाणी अत्यंत गढूळ आणि पिण्यास अयोग्य आहे. साखर कारखाना बंद असल्याने राजुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाचे बिल अद्याप मिळाले नाही. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.