आष्टी (बीड) -कोरोना विषाणूमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल शेतात पडून राहिल्याने खराब होत आहे. तसेच काढलेल्या शेतमालाला व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने, अगदी नगण्य दरामध्ये शेतमालाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टंचाईच्या काळात पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्याने टरबुजाची बाग जोपासली. मात्र आला लॉकडाऊनच्या संकटामुळे व्यापारी माल घेत नसल्याने टरबूज विकायचे कसे असा प्रश्न आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथील शेतकरी हनुमंत जाधव यांना पडला आहे.
टरबुजाच्या शेतीसाठी 5 लाखांचा खर्च
आष्टी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी हनुमंत जाधव यांनी 26 जानेवारी 2021 रोजी दोन एकर शेतामध्ये शेततलाव करत टरबुजाची लागवड केली. यासाठी साधारणपणे त्यांना शेततळ्यासह 5 लाखांचा खर्च आला. जानेवारीमध्ये त्यांनी टरबुजाची लागवड केली. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. त्यामुळे या पिकातून दोन पैसे हाती येतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र ऐन टरबूज काढण्याच्या वेळी पुन्हा कोरोना वाढल्यामुळे शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तर जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी माल घेत नसल्याने, हनुमंत जाधव यांनी घरासमोरच आपले टरबुजं विकण्याचा निर्णय घेतला आहे. यातून किमान खर्च तरी निघेल अशी त्यांना अपेक्षा आहे.