बीड -जिल्ह्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असतांना अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्र सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु येथे शेतकरी खते व बि-बियाणे खरेदी करण्यासाठी गेला असता त्याला अमानुषपणे पोलिसांकडून मारहाण केल्याची घटना गेवराई येथे घडली आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना खते व बियाणे थेट बांधावर -
गेवराई शहरातील कोल्हेर रोड या ठिकाणी किनगावचे शेतकरी मोतीराम अच्युतराव चाळक (४०) सोमवारी सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत खत व बियाणे खरेदीसाठी जात होते. त्यावेळेस पोलिसांनी त्यांना विचारपूस न करता बेदम मारहाण केली त्यात ते जबर जखमी झाले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासून मारहाण करणारे जे पोलीस आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि शासनाने शेतकऱ्यांना खते व बियाणे थेट बांधावर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केली आहे.
संबंधित पोलिसांविरोधात कारवाई करण्यास भाग पाडू -
गेवराई तालुक्यातील किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांची मंगळवारी सकाळी पूजा मोरे यांनी भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले मोतीराम चाळक यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. पोलीस अधीक्षक बीड व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना बोलून संबंधित पोलिसांविरोधात कारवाई करण्यास भाग पाडू असे आश्वासन राजू शेट्टी यांनी दिले.