बीड - दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या दोन हजार रुपयांचे व्याजासकट 28 हजार रुपये झाले. पैशासाठी गादा लावणार्या सावकाराकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. याचा अपमान सहन न झाल्याने संबंधित शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आला आहे. गंगाराम गावडे (42) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर लाला उर्फ युवराज पांडुरंग बहिर असे आरोपीचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी बीड तालुक्यातील राजुरी (नवगण) येथे घडली.
दोन हजार रुपयाचे 28 हजार व्याज; सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
सावकाराच्या जाचाला कंटाळून बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. गंगाराम गावडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील शेतकरी गंगाराम गावडे याने दोन वर्षापूर्वी आरोपीकडून दोन हजार रुपये घेतले होते. या दोन हजार रुपयांचे 28 हजार रुपये व्याजासह झाले, असे लाला उर्फ युवराज बहिर या खासगी सावकाराने मृताला सांगितले. तसेच त्याने शेतात बोलवले. त्या शेतकऱ्याची मोटरसायकल ठेऊन घेत त्याला बेदम मारहाण केली. यानंतर सावकाराच्या सततच्या तगाद्याला, मारहाणीला आणि मानहानीला कंटाळलेल्या त्या शेतकऱ्याने अखेर गळफास लावून घेत स्वत:चे जीवन संपविले.
दरम्यान, आशाबाई गंगाराम गावडे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आरोपी लाला उर्फ युवराज पांडुरंग बहिर फरार आहे.