बीड : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून केज तालुक्यात दोन मुलांचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अवकाळीचे काळेकुट्ट ढग घोंगावत आहेत. यापूर्वीही गारपीट व वीज कोसळून शेतीची आणि जीवितहानी झाली आहे. आज सकाळपासूनच केज तालुक्यातील काही भागात ढग दाटून आले. पाऊसही झाला. मस्साजोग भागात जोरदार गारपीट झाली आहे. तसेच केज तालुक्यातील केळगाव येथे वीज कोसळल्याने शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात वीज कोसळून जीवितहानीच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
यावर काही तोडगा निघेल का? : वीज कोसळून मृत्यूच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत असून, याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. कधी जनावरांचा बळी तर कधी शेतकऱ्यांचा बळी हा अवकाळी पाऊस व विज घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने पुर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. वीज कधी पडणार याची माहिती देणारे दामिनी हे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्याचे मागे सांगितले जात होते. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज रोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.