बीड - जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. शनिवारी बीडमध्ये जनावरांच्या छावणी वरील एका ६० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना घडली आहे. पारा ४२.१ अंशावर नोंदवला गेला. जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळ असल्यामुळे चाऱ्याची मोठी टंचाई आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी छावणीवर राहत आहेत. तर वाढत्या उष्माघाताचा शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.
बीडमध्ये उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी; पारा चढला ४२.१ अंशावर
जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळ असल्यामुळे चाऱ्याची मोठी टंचाई आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी छावणीवर राहत आहेत. तर वाढत्या उष्माघाताचा शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.
बंडू किसन मगर (वय ६०, रा.गढी) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बंडू मगर हे गेल्या काही दिवसांपूर्वीच ऊस तोडणीवरून परत आले होते. गावात जनावरांना चारा नसल्यामुळे गेवराई तालुक्यातील तळेवाडी फाटा येथील छावणीवर ते जनावरांसह राहण्यासाठी गेले होते. जनावरांना चारा टाकण्यासाठी मगर हे छावणीवर गेले याचदरम्यान अति उन्हामुळे त्यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. मगर जमिनीवर कोसळले असल्याचे पाहून छावणीवरील काही नागरिकांनी त्यांना तत्काळ गेवराई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल करण्यात आला आहे. मागील ८ दिवसात जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी साडेदहानंतर शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने जनावरांचे देखील हाल होत आहेत.