बीड- मागील अनेक दिवसापासून दिवसागणिक काही पैशांनी डिझेल, पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होत आहे. एक जून ते 24 जून या 24 दिवसात 8 रुपये 14 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये डिझेलदेखील त्याच तोडीत वाढत आहे. बुधवारी पेट्रोलचा भाव 87 रुपये 39 पैसे तर डिझेल 77 रुपये 86 पैसे प्रति लिटर होता. राज्यातील रोजगार व इतर क्षेत्रातील मंदी लक्षात घेता वाढत असलेले डिझेल-पेट्रोलचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या पचनी पडत नसल्याने नागरिकांमध्ये या दरवाढीबद्दल रोष असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मागील तीन महिने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन होता. या काळात अनेक नागरिकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. आता बाजारपेठ खुली झालेली आहे, मात्र म्हणावी तशी आर्थिक उलाढाल होत नाही. सगळीकडे आर्थिक संकट ओढवलेले असताना शासनाने डिझेल व पेट्रोलच्या दरात कमालीची वाढ केलेली आहे.