बीड - 'देशात लॉकडाऊन असतानाही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू आहेत. यामुळे वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या परराज्यातील मजुरांच्या जीवाला कोरोना विषाणूचा धोका आहे' याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी परळी येथील वीटभट्टी सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने परळी येथील उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी कारवाई करत वीटभट्टी सुरू ठेवणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा...धक्कादायक..! सर्रास सुरू आहेत परळी तालुक्यातील वीटभट्ट्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लागु केलेल्या जमावबंदींच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परळीतील तीन वीटभट्टी चालकांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत काही वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच तीनही वीटभट्टी चालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुदीन अब्दुल कादर मुल्लाजी यांच्या वीटभट्टीवर पाण्याचे टँकर असल्याने ते जप्त करण्यात आले. संतोष गवते यांच्या वीटभट्टीवर मजुरांच्या वाहतुकीसाठीचा रिक्षा होती, ती ताब्यात घेण्यात आला. मुख्तार खाँ दाऊद खाँ पठाण यांच्या वीटभट्टीवरील ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या तीनही वीटभट्टी चालकांविरुद्ध कालिदास पवार यांनी तक्रार दाखल केली होती. त्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यानही परळीमध्ये दोन हजार मजूर वीटभट्टीवर काम करत असल्याचे वास्तव 'ईटीव्ही भारत'नेच समोर आणले होते.
हेही वाचा...लोकांनी गर्दी कमी न केल्यास, प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तसेच त्याचा फैलाव लवकर होतो आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात देखील जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही परळी परिसरात वीटभट्ट्या सुरू होत्या.