बीड Shasan Aplya Dari : आम्ही आधी करतो आणि मग बोलतो, आम्ही घरात बसून राहात नाही तर शासन म्हणून सर्वांना बरोबर घेऊन आपल्या दारी येतो. त्यामुळं आज बीडच्या कार्यक्रमापर्यंत 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचं ठळक यश असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज केलं. परळी येथील ओपळे मैदानावर 'शासन आपल्या दारी' अंतर्गत विविध योजनांचे लाभ आणि जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन तसंच लोकार्पण पार पडलं. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन :राज्यातील 20 जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम झाला. त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमाने मोडले. याबद्दल धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे वाटप करण्यात आले. तर प्रस्तावित इमारत आणि वस्तीगृह, तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
अधिक मदत आणि निधी देण्याचा प्रयत्न: यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारी, प्रशासकीय, कृषी कार्यालय, सिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वस्तिगृह इमारत यांचा यात समावेश आहे. नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यात पुरवणी मागणीत अधिक मदत आणि निधी देण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. कृषिमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतले.
बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाही. शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असून, एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे आणि टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार: शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास विद्युत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृद्ध होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असं नियोजन असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचं फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थश्रेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ बहिण एक आहेत. त्यांच्यामध्ये काही दुही नाही. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देणारं वक्तव्यही यावेळी फडणवीस यांनी केलं.
केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधाला विरोध करण्यात अर्थ नसून विकास कामांसाठी एकत्रित येण्याची गरज आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाने मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.