बीड - भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीमध्ये कार्य करणाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले नाही तर उलट त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना घडवले, असे वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे केले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज (१२ डिसेंबर) जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या कन्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले. त्यावेळी खडसेंनी गेल्या 5 वर्षात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाट मोकळी करून दिली.
खडसे पुढे म्हणाले, महादेव जानकरांनी मान्य केले की भाजपने आम्हाला छळले आहे. मात्र, तरीदेखील महादेवराव मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी भाजपसोबत आहेत, हे एक उदाहरण आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, आणीबाणीच्या कालखंडात तुरुंगात होते तेव्हापासूनचा कालखंड मी पाहिला आहे. जनसंघापासूनची भाजपची वाटचाल मी पाहिली आहे. सुरूवातीला शेठजी-भटजींचा पक्ष असे हिणवले जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा पक्ष कऱण्याचे काम गोपीनाथ रावांनी केले. तर त्यांच्या भाषणादरम्यान नवीन पक्ष काढा नवीन, अशी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या.
हेही वाचा -अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत होणार अधिकृत प्रवेश
तसेच व्यासपीठावर बसलेले आज भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीमध्ये जेवढे कार्य केले. त्या सर्व कार्यकर्त्यांना मुंडेंनी घडवले आहे. मुंडे साहेबांसोबतच्या आठवणींनी मन व्याकूळ होते. १ जूनला आम्ही सोबत जेवण केले आणि ३ तारखेला परळीला येणारा माणूस परत आला नाही, याचे दु:ख असल्याचे ते म्हणाले. मुंडेंनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. 'हम तो डुबेंग सनम पर तुम को भी लेकर डुबेंगे,' असे सांगत ते यावेळी भावनिक झाले. जिथे एकनाथ तिथे गोपीनाथ अशी परिस्थिती होती. मात्र, तो खंबीर आधार माझ्या पाठिशी राहिला नाही याची राहून राहून खंत वाटते. पुढे बोलताना ते म्हणाले, पक्षाविरोधात बोलू नका, असा पक्षाच्या श्रेष्ठींचा आदेश आहे. मात्र, पक्षाची ही भूमिका मान्य नाही. वरून गोड बोलायचे आणि दुसऱ्याला मदत करून पाडायचे ही खंत आहे. हे आम्हाला मान्य नाही. गोपीनाथ रावांची मुलगी पाडली याचे दु:ख आहे. तसेच पकंजा यांना पराभव घडला नाही तर घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.