अंबाजोगाई - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीनंतर राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आरोग्य विभागाकडून बीड जिल्ह्यात 8 नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व 8 रुग्णवाहिका ऑक्सिजनसह अन्य सर्व सुविधांयुक्त असून, आज सकाळी त्या बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
आरोग्य विभागाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार आरोग्य संचालक स्तरावरून खरेदी प्रक्रिया राबवून आरोग्य उपसंचालक लातूर यांच्यामार्फत या 8 रुग्णवाहिका बीड जिल्हा आरोग्य विभागाला सुपूर्द केल्या आहेत.
यापैकी 2 रुग्णवाहिका बीड जिल्हा रुग्णालयात, 2 स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई, परळी उपजिल्हा रुग्णालय 1, केज उपजिल्हा रुग्णालय 1, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 1, धानोरा ग्रामीण रुग्णालय 1 याप्रमाणे वितरित केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी दिली आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड नियंत्रण, उपचार व उपाययोजनांच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेऊन, आवश्यक सामग्रीसाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून सुरक्षित ठेवणे हे आपले लक्ष्य असून, बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी ते प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात 8 नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्याने रुग्ण वाहतुकीत येणाऱ्या अडचणींना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा -लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याने ग्लोबल टेंडरला काढले, मात्र प्रतिसाद नाही - राजेश टोपे