बीड- जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. आष्टी तालुक्यातदेखील मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. अनेक ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन टॅंकरची मागणी करून देखील पंधरा-पंधरा दिवस पिण्याचे पाणी मिळत नसेल तर हे जिल्ह्यासाठी दुर्दैव आहे. पाणी टंचाई निवारणाबाबत बीडचे जिल्हाधिकारी यांचे नियोजन शून्य आहे. असा आरोप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी केला आहे.
बीडमध्ये पाणी टंचाई निवारणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन शून्य- आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी खरीप हंगाम नियोजन बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या संबंधी सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून व राज्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर आलेले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन पिण्याचे पाणी जिल्हा प्रशासनाकडे मागितले आहे. मात्र, पंधरा दिवसापासून ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हा प्रशासनाकडे धूळखात पडून आहेत. जर मागणी करूनही टँकर मिळत नसतील तर हे बीड जिल्ह्यासाठी दुर्दैव आहे. जिल्ह्यातील टंचाई निवारण करण्यात जिल्हाधिकारी असमर्थ ठरत आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत कुठलेच नियोजन केलेले नाही. असा आरोप देखील आ. धस यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.सध्या कोरोना विषाणू सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा बिकट परिस्थितीत पाण्याचा वापर अधिक होत आहे. मात्र गावातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ज्या ग्रामपंचायतींनी अथवा गावांनी पिण्याचे पाणी मागितले आहे. त्यांना 24 तासात टँकर द्यावे, अशी मागणी देखील यावेळी आमदार धस यांनी केली.