बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना स्थानिक शेतकरी बीड: छोटी छोटी पिकं आता पाऊस नसल्याने झोपू लागली आहेत. सध्या बीड जिल्ह्यामध्ये 60 टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. कमी ओल असलेल्या भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलेले आहे. बीड जिल्ह्यात 7 लाख 85786 हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो. परंतु, गेल्या 5 वर्षांत प्रथमच पावसाने दांडी मारल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 11 जुलै पर्यंत कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार केवळ 60.2% क्षेत्रावरच पेरणी झाली. बीड, वडवणी, परळी, धारूर, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यात 60 मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस झाला. येत्या तीन ते चार दिवसात दमदार पाऊस न झाल्यास ओल नसलेल्या जमिनीत दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोणत्या पिकांची किती प्रमाणात पेरणी?
बीड जिल्ह्यात 11 जुलै पर्यंत...
1)कापूस 1.95.373 हेक्टर,
2)सोयाबीन 202232 हेक्टर,
3)बाजरी पेरा 20,114 हेक्टर,
4)मका 2788 हेक्टर,
5)तूर 22870 हेक्टर,
6)उडीद 21538 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच पेऱ्याची टक्केवारी कमी राहिल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत:बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे खत, बी बियाणे घेऊन मातीत टाकले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. शेतकरी हा आपलं भविष्य काळ्या आईच्या जीवावर जगत असतो. पाऊस वेळेवर पडत नाही. यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पावसाचं निसर्गचक्र बदलतंय. त्यामुळे याचा परिणाम शेतीवर होताना पाहायला मिळतोय. आधुनिक तंत्रज्ञानाचा जरी वापर केला तरी वेळेवर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याविषयीचा Etv Bharat चा एक स्पेशल रिपोर्ट...!
काय म्हणतात जिल्ह्यातील शेतकरी?मृग नक्षत्र संपल्यानंतर कापूस असेल तूर असेल मूग हे पीक पेरण्यात आलेले आहेत. पिकाची लागवड मागेपुढे झाल्यामुळे पिकाची पार वाट लागली आहे. निसर्ग कोपलाच म्हणावा लागेल. रिमझिम पाऊस आहे. समाधानकारक पाऊस नसल्यामुळे कुठल्याही विहिरीला पाणी पातळी वाढली नाही आणि तलावामध्ये पाणी आलेले नाही. त्यामुळे यावर्षी काय होते हे सांगता येत नाही. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासणार असल्याचे जाणवत आहे. शेतामध्ये हरणांना खायला नाही आणि रानडुकरांचा तर रात्रंदिवस त्रास होत आहे. याच्यासाठी वन विभागाने याच्यावर उपाययोजना करावी. जेणेकरून आम्हाला आमच्या पिकाचे संरक्षण करता येईल. वन विभागाने या हरणांचा बंदोबस्त करावा. या नक्षत्रामध्ये पाऊस पडला नाही. पुढचे नक्षत्र जर कोरडे गेले तर विहिरी कोरड्या राहतील आणि तलावामध्ये तर पाणीच नाही. या अगोदरही आम्ही पिक विमा भरलेले आहेत. त्याचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत. आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. विमा भरण्यासाठी अनेक वेळेस चकरा माराव्या लागतात. नेटच्या समस्येमुळे आम्हाला अडचणी येतात. त्यामुळे आता काय करावे, असा सुद्धा प्रश्न आमच्या पुढे आहे, अशी व्यथा शेतकरी नवनाथ जामकर यांनी मांडली.
तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील?यावर्षी कापूस, बाजरी, मूग ही पिकं उशिरा पेरण्यात आलेली आहेत. यावर्षी उशिरा पेरणी झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट येणार आहे. आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कृषी मंत्री धनंजय मुंडे हे झालेले आहेत आणि त्यांनी या पिकविमाकडे आणि मागील नुकसान भरपाईकडे लक्ष द्यावे ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांसाठीच्या ज्या विविध योजना पंचायत समिती स्तरावरून राबवल्या जातात त्याच्याकडे सुद्धा कृषी मंत्र्यांनी लक्ष द्यावे. त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोव्या याच्यासाठी ते प्रयत्न करतील, अशी आमची अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यामध्ये पाण्याचा नैसर्गिक स्रोत कुठलाही नसल्यामुळे मोठा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणी सापडला आहे. बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि आम्ही घेतलेले बियाणे याचे पैसे जर वेळेवर गेले नाहीत तर बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. त्यामुळे वरूण राजांने बरसावे हीच आमची अपेक्षा आहे, असे शेतकरी दादासाहेब सोनवणे म्हणाले.
पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला:बीड जिल्ह्यात पेरणी उशिरा झाली. त्यामुळे उत्पादनामध्ये घट येणार आहे आणि थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावरच आम्ही पेरण्या केलेल्या आहेत. या पेरण्या झाल्यानंतर आता उगवून आला आहे. मात्र, आता चांगल्या पावसाची गरज आहे. पाऊस कमी असल्याने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि भविष्यात सुद्धा वाढणार आहे. भविष्यात पिकांसाठी लागणारे पाणी व जनावरांसाठी सध्याही पाण्याची टंचाई आहे. नदी, नाले, ओढे हे अजूनही कोरडे टाक आहेत. बोरवेल याला सुद्धा पाणी वाढलेले नाही.