बीड - येथील गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याला वैद्यकीय गर्भपात कायदा 2, 3, 4 कलमान्वये तसेच सरकारी कामात अडथळा, बोगस प्रॅक्टीस, साथरोगासह विविध कलमांखाली परळी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी दोन वेळा पोलीस कोठडी दिल्यानंतर मुंडे याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील रामनगर येथे शेतात दवाखाना चालू केल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलीस व वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी छापा टाकला होता. त्यावेळी आरोपी सुदाम मुंडे याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलीस कोठडी घेऊन परत रिमांड यादी अधिक चार, पाच नवीन भारतीय दंड विधानाप्रमाणे कलमे वाढवून मंगळवारी परळी न्यायालयात परत चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी सरकार पक्षाने केली. परंतु, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश यांनी आरोपी डॉ. सुदाम मुंडे याला न्यायालयीन कोठडी सुनावली.