बीड - मराठा समाजाच्या विवेक रहाडे या तरुणाने केलेली आत्महत्या ही समाजासाठीचे बलिदान आहे. आत्महत्येपूर्वी विवेकने लिहिलेल्या त्या चिठ्ठीकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असे मत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केले.
विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करू नका - मराठा क्रांती मोर्चा विवेक रहाडे या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीमुळे संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. गुरुवारी केतुरा गावाला छावणीचे स्वरूप आले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी दिलेल्या नीट परीक्षेत माझा नंबर लागेल का? या धास्तीने 17 वर्षीय विवेक रहाडे नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझ्या आत्महत्येनंतर तरी मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा.
गुरुवारी मराठा समन्वय समितीचे अशोक हिंगे, बी. बी. जाधव, जीवनराव जोगदंड, बळीराम गवते, अनिल घुमरे, रामहरी मेटे यांनी केतुरा गावात जाऊन विवेकचे वडील कल्याणराव रहाडे यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी विवेकचे वडील म्हणाले की, माझा मुलगा तर गेला मात्र समाजातील इतर मुलांच्या आत्महत्या शासनाने रोखाव्यात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गुरुवारी केतुरा या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सुप्रीम कोर्टाने नुकतीच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करून आरक्षण देण्याची मागणी अनेक नेते व अनेक संघटना करीत आहेत. मात्र, ओबीसी महासंघाने याला विरोध केला आहे. मराठा आरक्षणाला आमचे समर्थन आहे, परंतु ओबीसी संवर्गात त्यांचा समावेश करू नये, अशी भूमिका महासंघाची आहे. तर यावर मार्ग काढण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे येत्या 3 ऑक्टोबर रोजी विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे.