बीड- पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या परभणी जिल्ह्याच्या निरीक्षक तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा रेखा फड यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
4 सप्टेंबर 2018 साली सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात रेखा फड आपल्या काही महिला कार्यकर्त्यांसह तत्कालीन अधीक्षक जी. श्रीधर यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, अधीक्षक जी. श्रीधर हे कार्यालयीन कामकाजात व्यग्र होते. त्यांच्याकडे कार्यालयातील कर्मचारी महत्त्वाचे काम घेऊन कक्षात असल्याने फड यांना भेटीसाठी काहीवेळ प्रतीक्षा करावी लागली. अधीक्षकांच्या भेटीसाठी विलंब होऊ लागल्याने रेखा फड यांनी स्वागत कक्षात गोंधळ घातला. कक्षात कार्यरत महिला कर्मचारी अनिता दगडखैर यांच्याशी त्यांनी हुज्जत घालून मारहाणीची धमकी दिली. यानंतर शिवीगाळ करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.