बीड - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना शनिवारी दुपारी अचानक भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पशु मालकांची विचारपूस केली. बीड जिल्ह्यातील खोकरमोहा, रायमोहा, आव्हाळवाडी, शिरूर, तांबा राजुरी, पाटोदा येथील छावण्यांना जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली.
बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. छावणीवर दाखल झालेल्या जनावरांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मिळतात का ? याची तपासणी जिल्हाधिकारी पांडेय यांनी शनिवारी केली. जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी छावणी चालकाने घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना छावणी चालकांना दिल्या.