बीड- धुलीवंदनाच्या निमित्ताने मित्रांनी बोकड आणले. परंतु, तेथे आलेल्या एक मद्यपी मित्राने दमदाटी करून मटणाचा अधिक वाटा मागितला. त्यामुळे चांगलाच वाद सुरू झाला. या वादादरम्यान मध्यपी मित्राने गावठी कट्टा काढत एकाच्या डोक्यावर मारला. ही घटना गुरुवारी दुपारी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हातवळण येथे घडली.
मटणाच्या वाटणीवरून उफाळला वाद; गावठी कट्टा मारला डोक्यात - गावठी कट्टा
बीडमध्ये मटणाच्या वाटणीवरून दोघा मित्रांमध्ये वाद उफळला. या वादात मद्यपी मित्राने गावठी कट्टा काढत एकाच्या डोक्यावर मारला.
महेंद्र शंकर कोरडे याचे मित्र दस्तगीर चांद सय्यद, गोरख निवृत्ती काळोखे आणि इतर मित्रांनी मटणासाठी गुरुवारी बोकड आणले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दस्तगीर यांच्या घराशेजारी राहत असलेला मद्यपी मित्र जनार्दन बेरड हा तेथे आला आणि त्याने मटन मागितले. मात्र, मटन शिल्लक राहिले नव्हते.
यावरून महेंद्र कोरडे व जनार्दन बेरड यांच्यात वाद उफाळला. यादरम्यानच जनार्दन बेरड याने कमरेचा गावठी कट्टा काढून महेंद्रच्या डोक्यात मारला. याप्रकरणी कोरडे यांच्या फिर्यादीवरून जनार्धनवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी जनार्दन याच्याकडे गावठी कट्टा कुठून आला, याचा तपास आता अंभोरा पोलीस करत आहेत.