बीड- संदीप क्षीरसागर सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. आता लवकरच ते बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील, असे सुतोवाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. इतकेच नाही तर बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला याचे संकेत धनंजय मुंडे यांनी मंगळवारी शिवजयंतीच्या निमित्ताने दिले. बीड विधानसभा निवडणुकीसाठी काका आमदार जयदत्त क्षीरसागर व पुतणे संदीप शिरसागर यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याने धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने बीड राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांना विधानसभेच्या उमेदवारीचा दिलेला शब्द पाळणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला मंगळवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांनी हा शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जयंती उत्सवाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.