बीड - परळीत कोणती असुरक्षितता आहे ? उलट धनंजय मुंडे या तुमच्या भावाचे सुरक्षाकवच असल्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने महिला मेळाव्याला येवू शकतात, अशा शब्दात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी नणंद पंकजा मुंडे यांच्या परळीतील दहशतीच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले. तसेच 1500 गरीब भगिनींचे विवाह करणार्या या भावाच्या पाठीशी परळीच्या भगिनींचे आशीर्वाद आहेत. म्हणूनच त्यांच्यात राज्यात शिवस्वराज्य आणण्याची धमक आहे. त्यांना ते काम करू द्या. तुमच्या लेकाला, तुमच्या भावाला विजयी करण्याची जबाबदारी आपण सर्व मिळून हाती घेवूया, असे आवाहन राजश्री मुंडे यांनी केले.
हेही वाचा -.... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ
परळीत झालेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ हालगे गार्डन मधील महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर भाजप कडून पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परळीच्या या बहिण-भावाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही प्रमुख पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे. रोज एक नवा आरोप एक दुसऱ्यावर केला जात आहे. आरोप व प्रत्युत्तर या सगळ्या घडामोडींमुळे परळीसह जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात राजकीय आखाडा ढवळून निघत आहे. यावेळी अनुसयाताई ताटे, सिमाताई जोगदंड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.