बीड -अध्यात्मिक गड ही सामान्यांची श्रद्धास्थाने असतात. याठिकाणी राजकारण होणार नाही, तर केवळ विकासकारण होईल. सामान्यांची श्रद्धास्थाने आणि शक्तिस्थाने असणार्या या गडांचा विकास होण्यासाठी आपण प्रयत्न करू, राज्याची सेवा करण्यासाठी भगवानबाबांनी आपल्याला शक्ती द्यावी. असे साकडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडाला घातले. मंत्री झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील नारायणगड आणि गहिनीनाथ गडासह पाथर्डीमधील भगवानगडाचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
भगवान गडावर धनंजय मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. यावेळी त्यांच्यासमवेत आ. प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ. अमरसिंह पंडित यांची उपस्थिती होती. मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगवानगड भेटीला मोठे महत्त्व आहे, त्यांना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी 'मंत्रिपदाची शपथ घेऊन भगवानगडावर या' असे निमंत्रण दिले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर गेले होते. या ठिकाणी त्यांचे भक्त परिवाराने जंगी स्वागत करत, त्यांना १११ किलोचा हार घालण्यात आला. यावेळी गडावर मोठ्या प्रमाणावर भक्त परिवार उपस्थित होता.
मंत्री मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महंतांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, 'चार वर्षांपूर्वी या गडावर भक्तांनी आपल्या गाडीवर दगडफेक केली होती. मात्र, आज त्याच भगवानगडाने आपल्याला आशीर्वाद दिले आहेत, हे मी माझ्यासाठी महत्त्वाचे समजतो. आपण गडावर राजकारण कधीच केलेले नाही, यापुढेही गडाच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू’.