बीड - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांनी दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर करण्याचे साकडे गणरायाकडे घातले. तसेच त्यांनी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर होऊ दे, धनंजय मुंडेंचे गणरायाला साकडे - मंदीचे सावट दूर करण्याचे साकडे
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांनी दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर करण्याचे साकडे गणरायाकडे घातले.
धनंजय मुंडे हे दरवर्षी आपल्या परळी वैजनाथ या जन्मगावी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी विधीवत पूजा करुन सपत्नीक गणरायाची प्रतिष्ठापना केली. या देशाची भरभराट होऊ दे, असे साकडे यावेळी मुंडेंनी बाप्पाचरणी घातले.
सत्तापक्षातील नेत्यांना गणपती सद्बुद्धी देवो
गणपती बुद्धीची देवता आहे. आज देशात, राज्यात नीच पातळीचे राजकारण सुरू आहे. सत्तापक्षातील नेत्यांना गणपती सद्बुद्धी देवो ही सुद्धा प्रार्थना मुंडेंनी केली. त्याचप्रमाणे या सरकारने निर्माण केलेल्या महाभयंकर अशा आर्थिक संकटाला आपण तोंड देत आहोत. या सरकारला हे आर्थिक संकट तर दूर करता येणार नाही. विघ्नहर्त्याने ते संकट दूर करावं अशी प्रार्थनाही मुंडेंनी बाप्पाचरणी केली. हा उत्सव साजरा करताना दुष्काळाच्या संकटाचे भान ठेवावे, असे आवाहन करून मुंडेंनी गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.